गरीब बिचारा माधुकरी|
दु:ख तयाला जन्मभरी|
कडक उन्हाने जीव घाबरे|
गालावरुनी घाम ओघळे|
पायी चटके; तापे डोके|
धापा टाकत पळे जरी|
बुरबुर लागे पाऊसधारा|
चिखल माखला अंगी सारा|
घट्ट तपेली झोळी धरली|
धावत जातो घरोघरी|
भण भण झोंबे वारा अंगा|
तळपायाला पडल्या भेगा|
हात कापती दात वाजती|
कुडकुडतो हा घडोघडी|
विटक्या अपु-या मुकाट्यावाचुनी|
वस्त्र तयाला मिले न कोठुनी|
जरी ना सोवळे असे नेसले|
मिळे ना त्या तरी माधुकरी|
सण आनंदी घरोघरी जरी|
नित्य कपाळी सुटे ना वारी|
शिळी बुरसली खवट आंबली|
अशीच नशिबी सदा भाकरी|
उशीर कोठे कुठे संपले|
मिळे कालवण भाग्य उदेले|
नवा धरिली करी तपेली|
अश्रू तोंडी घास गीळी|
झोळी थोडी अजुनी ना भरली|
शाळेची तर घंटा झाली|
मुख हिरमुसले घास कोंबले|
दप्तर घेउनी पळे जरी|
शिळे त्यातले रात्रीकरता|
निजे उपाशी अपुरे पडता|
कुणा कळवला येई बोला|
कोण तयाची कीव करी|
नंबर गेला एक खालती|
जाईल नादारी ही भीती|
सांजसकाळी अभ्यासच करी|
फुरसत खेळा कुठे तरी|
गोसावी भट धन्य भिकारी|
तेलंग्याचे भाग्य किती तरी|
पैसा दूरच पुस्तक धोतर|
जुने द्यावया नसे घरी|
निजे कुणाच्या ओटीवरती|
अर्धे धोतर खाली वरती|
एकच सदरा तोच उशाला|
दया ना येते जागा परी|
यजमानाला पलंग गिरदी|
आत उकडते खुपते गादी|
पोटी धरुनी पाय जुळवुनी|
कुडकुडतो हा रात्रभरी|
पुण्यात आला अभ्यासाला|
पदोपदी जग आडवी त्याला|
विद्या करतो हाल सोशीतो|
शूर नव्हे का खरोखरी|
गरीब बिचारा माधुकरी|
17 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)


किती जुनी कविता असेल ही? माझे वडील ही कविता गुणगुणायचे.
ReplyDeleteविटक्या अपु-या मुकाट्यावाचुनी|
आणि
मिळे ना त्या तरी माधुकरी
ह्या ओळी जरा तपासून पहाव्यात.